डोंबिवली: पैशाच्या आमिषाने तीन दिवसाच्या अर्भकाची दोन लाख रूपयांना दत्तक प्रक्रिया पार न पाडताच विक्री केल्याचा धककादायक प्रकार मानपाडा हद्दीत नुकताच घडला असताना मुल दत्तक देण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला बगल दिल्याची दुसरी घटना पुर्वेकडील हद्दीत घडली आहे. नवजात 15 दिवसांच्या बाळाची दत्तक प्रक्रिया न करता खरेदी विक्री केल्याप्रकरणी आई वडीलांसह डॉक्टरवर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुर्वेकडील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणा-या प्रिया आहिरे आणि संतोष आहिरे यांना मुलगा मुलगी असताना त्या तिस-यांदा गर्भवती राहील्या. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तसेच प्रिया यांची तब्येत वारंवार खराब होत असल्याने हे बाळ सांभाळणो मुश्किल होऊन जाईल अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. प्रियाने तिच्या संपर्कातील डॉक्टर केतनी सोनी यांच्याशी संपर्क साधला. सोनी हे कल्याणमध्ये अनाथ मुलांचे वसतिगृह चालवित असून ते त्याठिकाणी शेकडो मुलांचे संगोपन करत आहेत. प्रिया गरोदर राहून पाच महिने उलटल्याने गर्भपात करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही बाळाला जन्म दया असा सल्ला सोनी यांनी दाम्पत्याला दिला. बाळंतपणाचा खर्च करण्याची देखील सोनी यांनी तयारी दर्शविली. केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात 10 नोव्हेंबरला रोजी बाळाला जन्म दिला. ठरल्याप्रमाणे आहिरे दाम्पत्याने 15 नोव्हेंबरला गणपती मंदिराजवळ डॉ सोनी यांच्याकडे बाळाचा ताबा दिला. दरम्यान चार ते पाच दिवसांनी प्रियाला बाळाची आठवण येऊ लागल्याने त्यांनी डॉ सोनी यांच्याकडे आपल बाळ देण्याची मागणी केली. त्यावर बाळ परत देतो माङो खर्च झालेले पैसे दे असे सोनी यांनी सांगितले. पण पैसे देऊ न शकत असल्याने आहिरे दाम्पत्याने ठाणो येथील सलाम बालक ट्रस्ट चाईल्ड लाईन यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार संस्थेच्या समन्वयक श्रध्दा नारकर यांनी गुरूवारी रात्री रामनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. यावरून दत्तक प्रक्रिया पूर्ण न करता बाळाची खरेदी विक्रीचा व्यवहार केला म्हणून डॉक्टर सोनीसह बाळाची आई प्रिया आणि वडील संतोष यांच्यावर बाल न्याय काळजी व संरक्षण कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले असून त्याला सध्या जननी आशिष संगोपन केंद्रात ठेवले आहे. दरम्यान या गुन्हयाप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तिघांना समजपत्र देवून सोडून देण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात आरोपींना दोषारोपासह कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.