Digital Arrest Cyber Crime: देशभरात ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Frauds) घटना प्रचंड वेगाने वाढत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे उच्चशिक्षित, मोठ्या पदांवरील नोकरदार आणि उद्योजकही या सायबर फ्रॉडचे बळी ठरत आहेत. सायबर गुन्हेगारीत 'डिजिटल अरेस्ट'च्या घटना वाढल्या आहेत. आता ॲटोमिक एनर्जी विभागातील एका वैज्ञानिकाला सायबर गुन्हेगारांनी फसवल्याची घटना समोर आली आहे.
डिजिटल अरेस्ट: वैज्ञानिकासोबत काय घडले?
एक कॉल करून सायबर गुन्हेगार समोरच्या व्यक्तीला धमकावतात आणि प्रकरण मिटवण्यासाठी पैसे मागतात.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये अशीच घटना घडली आहे. ॲटोमिक एनर्जी विभागातील एका वैज्ञानिकाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले. आरोपींनी या वैज्ञानिकाकडून प्रकरण दाबण्यासाठी ७१ लाख रुपये घेतले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैज्ञानिकानेही त्यांना इतके पैसे दिले. अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश दंडोतिया यांनी या घटनेबद्दल माहिती दिली.
महिलेचा छळ, मनी लॉड्रिंग आणि मानवी तस्करी
पोलीस अधिकारी दंडोतिया यांनी सांगितले की, "डिजिटल अरेस्ट करणाऱ्या आरोपीच्या गटातील एकाने राजा रमन्ना ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी सेंटर (RRCAT) मधील संशोधकाला १ सप्टेंबर रोजी कॉल केला. आरोपीने स्वतःला ट्रायचा (Telecom Regulatory Authority of India) अधिकारी असल्याचे सांगितले."
दंडोतियांनी पुढे सांगितले की, "आरोपीने संशोधकाला धमकावले. दिल्लीमध्ये एका मोबाईलवरून महिलांचा छळ केल्याचे मेसेज पाठवले गेले आहे आणि ते सीमकार्ड तुमच्या नावावर आहे. इतकेच नाही, तर मनी लॉड्रिंग आणि मानवी तस्करीच्या एका प्रकरणातही तुमच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. दुसऱ्या एका आरोपीने स्वतःला सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगितले आणि व्हिडीओ कॉल करून संशोधक आणि त्याच्या पत्नीची चौकशी केली. घाबरलेल्या संशोधकाने सायबर ठगांच्या वेगवेगळ्या खात्यात ७१ लाख ३३ हजार रुपये पाठवले."
कॉल करणारे खरे अधिकारी नव्हते, हे लक्षात आल्यानंतर संशोधकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हा दाखल करून घेत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.