धुळे : घरात आलेल्या अनोळखी व्यक्तीने साधूचा वेश परिधान करून महिलेसह तिच्या पतीचा विश्वास संपादन केला. मंत्रोच्चार करत पैसे नाही तर दागिने ठेवा. सायंकाळी पुन्हा जेवणासाठी येण्याचे सांगत १८ हजाराचे दागिने लांबविले. ही घटना २९ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता देवपुरातील नेहरू हौसिंग सोसायटीत घडली. साधूही आला नाही आणि दागिने मिळाले नाही. फसगत झाल्याचे लक्षात येताच देवपूर पोलिस ठाण्यात शनिवारी अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
किरण शेखर जडे (वय ४२,रा. नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर धुळे) या महिलेने देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, किरण जडे या महिलेचा पती शेखर जडे याने २९ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास साधूचा वेश परिधान केलेल्या अनोळखी व्यक्तीला घरी आणले. त्याचा आदर सत्कार केला. त्या व्यक्तीनेही या पती-पत्नीचा विश्वास संपादन केला. गप्पांमध्ये त्याने पैशांची मागणी केली. पण, पैसे नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर त्याने सोन्याचे दागिने असतील तरी चालेल असे सांगितले. त्यामुळे त्या व्यक्तीसमोर ६ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे कानातले काप, १२ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असा १८ हजार रुपये किमतीचा ऐवज काढून त्या अनोळखी व्यक्तीसमोर ठेवण्यात आला.
त्या अनोळखी व्यक्तीने जडे परिवारासमोर काही मंत्रोच्चार केला. थोड्या वेळाने त्याने दागिने घेऊन जातो आणि सायंकाळी पुन्हा आपले दागिने परत करतो, त्यानंतर तुमच्यासोबत जेवण करतो असे सांगत दोघांचा विश्वास संपादन केला. या दोघांनीही त्याला दागिने देऊन टाकले. सायंकाळपर्यंत त्याची वाट पाहण्यात आली. दीड महिना उलटूनही तो आलाच नाही. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच जडे परिवाराने देवपूर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता भादंवि कलम ४०६, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक व्ही. डी. शिरसाठ घटनेचा तपास करीत आहेत.