मुंबई - सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (CAA) ईशान्य दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते असून ३० ते ३५ पाहिजे आरोपींविरोधात मरिन ड्राईव्ह पोलिसांनी भा. दं. वि कलम ३७ (१) (३) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक सलग दुसऱ्या दिवशी आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. सलग दुसऱ्या दिवशी उसळलेल्या हिंसाचाराच्या आगडोंबामुळे एका पोलिसासह इतर दहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Delhi Violence : दिल्लीत हिंसाचाराची धग कायम; 10 जणांचा मृत्यू, 150 जण जखमी
दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचारात १० जण मृत्युमुखी पडले तर जवळपास १५० जण जखमी झाले आहेत. या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलनकर्त्यांना सोमवारी रात्री उशीरा कँडल मार्च काढण्यास पोलिसांनी अटकाव केला . त्यानंतर गेट वे ऑफ इंडियाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. दरम्यान, आंदोलकांनी पोलिसांच्या अटकावामुळे मरिन ड्राईव्ह गाठत सुंदरमल जंक्शन येथे कँडलसह ठिय्या आंदोलन केले. एकूण ३० ते ३५ पाहिजे आरोपितांनी CAA आणि NRC कायद्याच्या विरोधात भाषणे, निदर्शने करून शेम शेम अशा घोषणा देऊन कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचवली म्हणून मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान ही जागा निदर्शनांसाठी निश्चित करण्यात आलेली असताना देखील आंदोलकांनी निदर्शनासाठी गेट वे ऑफ इंडिया परिसरात आले तिथे येण्यापासून त्यांना रोखलं असता ते मरिन ड्राइव्ह परिसरात जमा झाले. यामुळे स्थानिकांची गैरसोय होत होती. नेमून दिलेल्या जागेशिवाय शहरात इतरत्र कुठेही बेकायदेशीरपणे गर्दी जमाँ केल्यास संबंधितांवर अटकेची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.