- नरेश रहिलेगोंदिया - एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून पोलिसांच्या डायल ११२ या क्रमांकावर वारंवार कॉल येत होते. एका लहान मुलाचा मर्डर झाला आहे, त्वरित पोलीस मदत पाठवा अशी माहिती दिली जात होती व तो फोन बंद होत होता. त्यावर फोन करणाऱ्या महिलेला ६ महिन्याचा कारावास अर्जुनी-मोरगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाने सुनावला आहे.
त्या महिलेचा वारंवार फोन येत असल्याने अर्जुनी-मोरगावचे ठाणेदार सोमनाथ कदम यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन वेळा तपास पथक पाठवले. परंतु अशी कोणती घटना घडली नसल्याचे व पोलिसांना वारंवार खोटी माहिती देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ठाणेदार सोमनाथ कदम यांनी त्या अनोळखी मोबाईल क्रमांकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नंबर २३५/ २०२२ भादंवि १७७ प्रमाणे दाखल केला. न्यायालयाकडून तपासाची परवानगी घेतली. सर्व भौतिक व तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी शिल्पा महेंद्र डोंगरवार रा. महागाव हिने डायल ११२ या प्रणालीवर कॉल केला होता. अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी आरोपीला दोषारोपपत्रासह न्यायालयात हजर केले. अर्जुनी मोरगाव न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी मनोद तोकले यांनी सर्व साक्षीपुराव्यांची पडताळणी करून आरोपी महिलेला ६ महिने कारावास व ५०० रुपये दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सारिका कातेखाई यांनी काम पाहिले.
आरोपीविरुद्ध शिक्षा ठोठावतांना तिच्यावर दया दाखविणे योग्य असणार नाही असे मला वाटते. आरोपीने केलेल्या बेकायदेशीर कृत्याबाबत व भादंविचे कलम १७७ नुसारच्या गुन्हयाबाबत तिला ६ महीने साधा कारावासाची शिक्षा व ५०० रुपये दंडाची शिक्षा करण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे. तपास पोलीस अधीक्षक गोंदिया विश्व पानसरे व उपविभागीय पोलिस अधिकारी विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी-मोर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागडे, पोलीस हवालदार प्रल्हाद खोटेले, पोलीस नायक खुशाल आरसोडे, राहूल चिचमलकर, प्रवीण बेहरे, पोलीस शिपाई श्रीकांत मेश्राम, पोलीस हवालदार आनंदराव भोयर यांनी केला होता.
तब्बल ११० वेळा केला फोनआरोपी महिलेने डायल ११२ वर १२ ते २१ जुलै या कालावधीमध्ये एकूण ११० वेळा कॉल केल्याचे व खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने तब्बल ११० वेळा पोलिसांना ११२ प्रणालीवर फोन करुन पोलिसांची दिशाभूल करणारी माहीती तिने दिली. पोलिसांना वारंवार शारीरीक व मानसिक त्रास दिला. ११२ प्रणाली ही नागरीकांच्या सोयीसाठी केलेली असतांना त्याचा दुरुपयोग अशा तऱ्हेने करणे हे अत्यंत दुर्देवाची बाब आहे.