मुंबई - भारतीय रिर्झव्ह बँकेच्या (आरबीआय) हेल्पलाईनवर फोन केला आणि एका सेकंदात त्याच्या बँक खात्यातून 48 हजार रुपयांना गंडा पडला आहे. विजयकुमार मारवा असं या व्यक्तीचे नाव असून ते मालाड येथे राहतात.
मारवा यांना घरात साफसफाई करताना 7 हजार रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या. त्या बदलून मिळतील का याची चौकशी करण्यासाठी त्यांनी गूगलवर आरबीआयचा हेल्पलाईन क्रमांक सर्च केला. मिळालेल्या क्रमांकावर त्यांनी फोन केला. समोरच्या व्यक्तीने त्यांना जुन्या नोटा बदलून देण्याचे आश्वासन देत त्यांच्या क्रेडीट कार्डची डिटेल्स मागितली. ज्यात त्यांचा पासवर्डही होता. त्यानंतर काही सेकंदातच मारवा यांना बँक खात्यातून ४८ हजार रुपये काढल्याचा मेसेज आला .ते बघताच आपली फसवणूक झाल्याचे मारवा यांच्या लक्षात आले व त्यांनी पोलिसात याबाबत तक्रार केली. याप्रकरणी बोलताना महाराष्ट्र सायबर विभागाचे अधिक्षक बालसिंग राजपूत म्हणाले की सायबर गुन्हेगारांनी हल्ली नव्यानेच हे तंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोकांनीच बँकेची डिटेल्स कोणाला न देता प्रत्यक्ष बँकेत जावे व सावधगिरी बाळगावी. तसेच अधिकृत वेबसाईटच सर्च कराव्यात.