नवी दिल्ली - आग्रा येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या ताजमहालमध्ये (Taj Mahal) बॉम्ब ठेवण्यात आल्याचा कॉल आल्यानंतर गुरुवारी सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ उडाली. ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची सूचना सुरक्षा यंत्रणांना एका अज्ञात फोन कॉलवरून मिळाली. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी सीआयएसएफ आणि उत्तर प्रदेशपोलिसांनी ताजमहालमध्ये उपस्थित असलेल्या पर्यटकांना तातडीने बाहेर काढले. तसेच ताजमहालचे तिन्ही गेट बंद करण्यात आले. मूळचा फिरोजाबादचा असणाऱ्या या तरुणाने फोन करुन बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी फेक कॉल प्रकरणात एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी हा फोन करणाऱ्या क्रमांकाला ट्रेस केलं. त्यानंतर हा फोन करणारा व्यक्ती फिरोजाबादचा असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर आग्रा पोलिसांनी फिरोजाबाद पोलीस प्रशासनाला अलर्ट केलं. चौकशीदरम्यान तरुणाने फेक कॉल का केला याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तरूणाने आपणच खोटी धमकी देणारा फोन केल्याचं तरुणानं कबूल केलं. सैन्य भरती रद्द झाल्यामुळे हा तरुण नाराज झाला होता, त्यामुळे त्याने असा फेक कॉल केल्याचं म्हटलं आहे.
भारतीय सैन्यात दाखल होण्यासाठी या तरुणाचे प्रयत्न सुरू होते. मात्र सैन्य भरती रद्द झाल्यानंतर तो नाराज झाला होता. त्यामुळे फेक कॉल केल्याचं तरुणाने पोलिसांसमोर कबूल केलं आहे. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बॉम्बची सूचना देणाऱ्या फोननंतर सुरक्षा यंत्रणेकडून संपूर्ण परिसराची झाडाझडती घेण्यात आली. यानतंर ज्या क्रमांकावर फोन आला त्यासंबंधी तपास केला असता ही अफवा असल्याचे समोर आले. मूळचा फिरोजाबादचा असणाऱ्या तरुणाने फोन करुन बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिल्याचे उघड झाल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, त्याची अधिक चौकशी केली जात आहे.