फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीला घरी बोलावणं दिल्लीतील तरुणाला अंगलट आलं आहे. पत्नीच्या गैरहजेरीत घरी आलेली फेसबुक फ्रेण्ड सोनं लुटून पसार झाली. सामान आणण्याच्या बहाण्याने तिने तरुणाला घराबाहेर पाठवलं आणि संधीचा फायदा घेत तिने त्याच्या पत्नीचे दागिने आणि २२ हजार रुपयांसह पोबारा केला.
दिल्लीत राहणाऱ्या पीडित तरुणाची आरोपी तरुणीशी सोशल मीडियाचे माध्यम असलेल्या फेसबुकवर ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत रूपांतर झालं, नंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यामुळे तरुणाने पत्नी घरी नसताना तिला घरी बोलावले. आरोपी तरुणीने चलाखीने त्याला बाजारात सामान आणण्यासाठी पाठवलं आणि घर साफ केलं. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत ती दागिने आणि पैशांवर डल्ला मारून फरार झाली. तरुणाने तिला फोन केला, तेव्हा त्यालाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी तिने दिली. कल्याणपुरी पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
कशी झाली ओळख?
तक्रारदार तरुण त्रिलोकपुरी भागात पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. लखनऊमध्ये राहणाऱ्या हेमलता पाठक नावाच्या तरुणीशी त्याची फेसबुकवर ओळख झाली. तिने आपण ज्योतिषी असल्याची बतावणी तरुणासोबत केली होती. फेसबुकवर चॅटिंग झाल्यानंतर दोघांनी नंबर शेअर केले. नंतर दोघांमध्ये चॅटिंग वाढलं आणि नंतर तो तिला हरिद्वार आणि वृंदावनलाही फिरण्यासाठी घेऊन गेला होता. अनेक वेळा ते दिल्लीत भेटीगाठी झाल्या.
तक्रारदार तरुणाची पत्नी काही दिवसांपासून घरी नव्हती. हेमलताने त्याच्या घरी जाण्यात उत्सुकता दाखवली. त्यानुसार शुक्रवारी ती त्याच्या घरी गेली. त्यानंतर सामान आणण्याच्या बहाण्याने तिने त्याला घराबाहेर पाठवून घर लुटलं. तरुण घरी आला असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पसरलेले पाहून त्याला धक्काच बसला. घरातील लॉकर उघडा होता. पत्नीचे दागिने आणि २२ हजार रुपये गायब झाले होते. पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपी तरुणीचा शोध घेत आहेत.