हरयाणाच्या गुरुग्राममधील एका उद्योजकाच्या घरातून नोकराने दीड कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तूंसह पोबारा केला आहे. उद्योगजक मालकाच्या वृद्ध आई-वडिलांच्या जेवणाता अमली पदार्थ मिसळून त्यांना बेशुद्ध केलं. त्यानंतर, घरातील ३५ लाख रुपये रोकड, दीड कोटींचे दागिने आणि घरातील इनोव्हा कार घेऊन धूम ठोकली. या चोरीत अन्य दोघांनीही त्याला साथ दिली. एकूण चार जणांनी एकत्र येत हा मोठ्या चोरीचा प्लॅन आखला होता. विशेष म्हणजे आरोपी वीरेंद्र आणि त्याची पत्नी यशोदा हे मूळ नेपाळचे रहिवाशी आहेत.
घरातीले चोरी संदर्भात कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. तसेच, वृद्ध दाम्पत्यांस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी नोकर हे मूळ नेपाळचे असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी या कुटुंबात नोकरीला सुरुवात केली होती. दरम्यान, घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरीची घटना कैद झाली असून पोलिसांनी संपूर्ण तपास सुरू केला आहे. त्यादृष्टीने आरोपीचा शोधही घेण्यात येत आहे.
अचल गर्ग असं या उद्योजकाचे नाव असून दिल्लीतच त्यांचा व्यावसाय आहे. गुरुवारी सकाळी ते आपल्या पत्नी आणि मुलांसह जयपूर फिरायला गेले होते. त्यावेळी, घरात त्यांचे वृद्ध आई-वडिल दोघेच होते. त्याचदिवशी बहिण निकीताचा अचल यांना फोन आला. तिनेच घडलेल्या घटनेची माहिती भावाला दिली. निकीतानेच त्यांना रुग्णालयात दाखल केले, जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बहिणीचा फोन आल्यानंतर अचर गर्ग तात्काळ आपल्या कुटुंबासमवेत गुरुग्रामला पोहोचले. सर्वात आधी ते रुग्णालयात पोहोचले, तेथे आई-वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर ते घरी गेले. त्यावेळी, घरातील ३५ लाख रुपयांची रोकड, दीड कोटी रुपयांचे दागिने आणि त्यांची कारही चोरी झाल्याचे उघडकीस आले. एक आठवड्यापूर्वीच नोकर दाम्पत्य घरी कामासाठी आले होते, अशी माहिती अचल यांनी पोलिसांना दिली.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे ईस्ट गुरुग्रामचे डीसीपी मयांक गुप्ता यांनी सांगितले.