मुंबई - नवी दिल्लीत २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादव अडचणीत सापडला आहे. कुस्तीपटू नरसिंग यादव हा सध्या मुंबई पोलीस दलात एलए - ५ मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर कार्यरत आहे. त्यामुळे पोलीस दलात दलात कार्यरत असून देखील नरसिंग यादव हा उत्तर मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम याचा प्रचार करत असल्याचं पुढे आल्यानंतर त्याच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय अभिनेता, अभिनेत्री किंवा खेळाडूंचा लोकप्रियतेचा उपयोग करताना दिसत आहेत. मात्र, काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचाराला उपस्थित राहून कुस्तीपटू आणि एसीपी नरसिंग यादव अडचणीत आला आहे. २०१० मध्ये नरसिंग यादवने राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्यामुळे त्याची नियुक्ती थेट पोलीस उपअधिक्षकपदी करण्यात आली होती. नियमानुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करता येत नाही. असे असून देखील काँग्रेसचे उत्तर पश्चिमचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारात नरसिंह हे सहभागी झाले होते. तसेच सरकारी अधिकारी असलेले यादव हे काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्यासोबत स्टेजवर प्रचार करत असल्याची बाब निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या ही लक्षात आली. त्यानुसार खात्रीसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी निरुपम यांच्या सभेदरम्यान काढण्यात आलेले चित्रीकरण तपासले. त्यात यादव हे काँग्रेस नेत्यांसोबत आढळल्यानंतर त्यांच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात ‘रिप्रेझेंन्टेटीव्ह ऑफ पोलीस कायदा’ कलम १२९(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे लवकरच यादव यांना पोलिस दलातील विभागीय चौकशीलाही सामोरे जावे लागणार आहे.