वरूड (अमरावती) : शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाई गावात ग्रामपंचायत निवडणुकीकरिता मतदान सुरू असताना खुद्द उमेदवारच एका डबकीतून गावात दारूचे वाटप करीत मतदारांना प्रलोभन देत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. ही घटना सकाळी १० वाजतादरम्यान घडली. शेंदूरजनाघाट पोलिसांनी आरोपी उमेदवाराविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाही केली.
पोलीस सूत्रानुसार, आरोपीचे नाव रुपेश लक्ष्मण फुसे ( ४४, रा.वाई) असे आहे. आरोपी हा ग्रामपंचायत निवडणूक करीता वाई गावात सदस्य पदाकरिता उमेदवार असून त्याने मतदाराला प्रलोभन देत गावठी हातभट्टी दारू मतदाराला वाटप करीत होता, अशी खात्रीलायक माहिती ठाणेदार श्रीराम गेडाम यांना मिळाली. पोलिसांनी धाडसत्र राबविले. यात आरोपीकडून एका प्लॅस्टिक जारमध्ये ३ लिटर गावठी हातभट्टी दारू, एक स्टील ग्लास, एक स्टील गडवा असा एकूण ३३० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. यावरून आरोपी उमेदवाराविरुद्ध कलम ६५ (ई) म.दा का सहकलम १३५ (ग)लोकप्रतिनिधी कायदा सन १९५१ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार श्रीराम गेडाम यांच्या मार्गदर्शनात शेंदूरजनाघाट पोलीस करीत आहे.