डोंबिवली: महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर असलेल्या धुळयातील शिरपूर तालुक्यात गांजाची शेती फुलविणा-या दोघांसह डोंबिवलीतील सप्लायरला मानपाडा पोलिसांनीअटक करून त्याच्याकडील 3 लाख 10 हजार 500 रूपये किमतीचा गांजा व रोख रककम आणि मोबाईल फोन जप्त केला आहे. शिरपूर तालुक्यात वन विभागाच्या जागेत ही गांजाची शेती आदीवासी लोकांकडून छुप्या पध्दतीने फुलविली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. अटक आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सुनिल तारमळे यांना शिवम हॉटेलच्या परिसरात एकजण गांजाचा माल घेऊन येणार असल्याची माहीती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार तारमळे यांच्यासह पोलिस नाईक प्रशांत वानखेडे, अशोक कोकोडे, सुशांत तांबे, पोलिस शिपाई संतोष वायकर, ताराचंद सोनवणे आदिंच्या पथकाने सापळा लावला. दोन गोण्यांजवळ एकजण उभा असल्याचे निदर्शनास पडताच त्याला ताब्यात घेऊन गोण्यांची तपासणी केली. यात 20 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा आढळुन आला. याप्रकरणी आनंद शंकर देवकर या 32 वर्षीय व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गांजाचा माल धुळे जिल्हयातील शिरपूर तालुक्यातून डोंबिवलीत आणल्याची माहीती दिली. याठिकाणी तो महाविद्यालयीन विद्यार्थी आणि रिक्षाचालकांना विक्री करायचा. येथील शिवमंदिर, टाटा पावर परिसरात राहणा-या आनंदची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून त्याच्या विरोधात रामनगर पोलिस ठाण्यात मारामारी, विनयभंग, चोरी, हत्यार बाळगणे आदि गुन्हे दाखल आहेत.ग्राहक बनून दोघांना केली अटकआनंदने दिलेल्या माहीतीनुसार पथक धुळयाला रवाना झाले. त्याठिकाणी ग्राहक बनून पोलिसांनी रेहमल पावरा आणि संदीप पावरा या दोघांना अटक केली. यातील तिसरा आरोपी दिनेश पावरा हा फरार असल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी दिली. ताब्यात घेतलेल्या गांजाची शेती आदीवासी लोकांकडून शिरपूर तालुक्यातील वन विभागाच्या जागेत छुप्या पध्दतीने केली जात आहे. तो गांजा चोरटया मार्गाने शहरी भागात विक्री करण्यासाठी आणला जायचा. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि रिक्षाचालक गांजा खरेदी करायचे. गांजा खरेदी करणा-यांवर देखील कारवाई केली जाणार आहे याकडे बागडे यांनी लक्ष वेधले.