मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा भाऊ आणि नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. हा व्हिडीओ जवळपास एका महिन्यापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. कुर्ला येथील आपल्या प्रभागात विनावर्क ऑर्डर रस्त्याचे काम सुरु असल्याने कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केली. तसेच कामगारांना हात पाय कापून टाकण्याची धमकी दिली. हा मारहाणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वायरल होत आहे.
कुर्ला येथे रस्त्याचे काम सुरु होते. त्या ठिकाणी ४ कामगार पाईपमध्ये वायर टाकण्याचे काम करत होते. त्याठिकाणी प्रभाग क्रमांक ७० चे नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांकडे कामाच्या वर्क ऑर्डरची मागितली. त्यावर, कामगारांनी कोणतीही ऑर्डर दाखवली नाही. त्यानंतर मलिक यांनी कामगारांना मारहाण केली असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
याबाबत टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना कप्तान मलिक म्हणाले, तो खाजगी कंत्राटदार होता. तो कुठेतरी महानगरपालिकेला मोठा धोका पोचवायचं काम करत होता. आधी पण मी विनंती करून सांगितलं तुम्ही काम थांबवा. महानगरपालिकेने किती पैसे भरले रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना जाऊन दाखवा आणि त्यांची परवानगी घेऊन काम सुरु करा. त्यांच्याकडे एकही परवानगी नव्हती. विनापरवानगी ते काम करत होते. मी विनंती केली त्यादिवशी त्यांनी काम थांबवलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी काम सुरु केलं. रविवारी काम सुरु असताना मी पाहिलं. त्यांची दादागिरी सुरु होती. ते थांबविण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं. मी चुकीचं केलं असतं तर त्या कामगारांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केला असता. मात्र, अशा प्रकारे कामगारांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा व्हिडीओ वायरल झाल्याने समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.