दर्यापूर (अमरावती) : भरधाव कार अपघातग्रस्त होऊन एका दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्या दाम्पत्याचा १६ वर्षीय मुलगा व चालक गंभीर जखमी झाले. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास दर्यापूर-अकोला मार्गावरील तोंगलाबाद-सौंदळी फाटा मार्गावर हा अपघात घडला. विजय खंडारे (४८) व वृषाली विजय खंडारे (४५, रा. जागृती कॉलनी, बनोसा, दर्यापूर) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. खंडारे हे शिवसेनेचे उपशहरप्रमुख होते.
अपघातात गंभीर जखमी झालेला पार्थ विजय खंडारे (१६), वाहनचालक मंगेश घोडस्कर (३८, रा. दर्यापूर) यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही. मात्र, खंडारे यांच्या कारची अवस्था पाहता, त्यांचे वाहन समोरच्या एखाद्या मोठ्या वाहनावर मागून आदळले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
शहरातील दिलीप एजन्सीचे संचालक असलेले विजय खंडारे हे पत्नी आणि पार्थ आणि अंशु (५) या दोन मुलांसह सोमवारी रात्री ११ च्या सुमारास अहमदनगरजवळ मंगळवारी होणाऱ्या महानुभावपंथीयांच्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एमएच २७ एआर ८२५९ क्रमांकाच्या कारने दर्यापूरहून निघाले होते. दर्यापूरहून १२ किलोमीटर अंतरावरील तोंगलाबाद-सौंदळी फाट्यानजीक त्यांची कार अपघातग्रस्त झाली. यात मागील सीटवर बसलेल्या खंडारे दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने अकोल्याला हलविण्यात आले. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.
कुटुंब उद्ध्वस्त
शहरातील युवा उद्योजक म्हणून ओळख असणारे विजय खंडारे सामाजिक आणि राजकीय कार्यात नेहमी सहभागी होत असत. सोमवारी दिवसभर त्यांनी दुकानातील व्यवहार केले. भेटलेल्या अनेक व्यक्तींशी चर्चा केली. यानंतर काही तासांत अपघातात कुटुंब उद्ध्वस्त झाले.
पार्थची मृत्यूशी झुंज
अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेला विजय खंडारे यांचा मोठा मुलगा पार्थ हा मृत्यूशी झुंज देत आहे. पाच वर्षांचा अंशु हा नातेवाइकांना ‘आई बाबा कुठे गेले? मला त्यांच्याजवळ जायचे आहे’, असा आग्रह धरत आहे. तुझे आईबाबा आता दूरच्या प्रवासाला निघून गेलेत, ते आता नाही परतणार, हे त्या अबोध चिमुकल्याला सांगायचे तरी कसे, अशी शोकविव्हळ परिस्थिती आप्तांवर येऊन ठेपली आहे.