ग्वालियर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका कारमालकाने रागाच्या भरात पेट्रोल ओतून स्वत:च्या कारला आग लावल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फायनान्स कंपनीचे कर्मचारी कार आपल्या ताब्यात घेण्यासाठी आले होते, यामुळे कार मालक तरूणाला एवढा राग आला की त्याने स्वत:च्या हाताने पेट्रोल ओतून कार जाळली, असे सांगण्यात येत आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी गोलामधील मंदिर भिंड रोड येथे घडली.
घटनास्थळी उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की, तरुणाने कारसाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीचे वसुली पथक पोहोचले आणि कार घेऊन जाण्यास सुरुवात केली. त्यानंतर कार मालक विनय शर्मा घटनास्थळी पोहोचला, त्याच्या हातात पेट्रोलची बाटली होती.
विनय शर्मा याने कारवर पेट्रोल टाकून आग लावली. काही वेळातच कारने पेट घेतला. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि कारला लागलेल्या आगीवरील परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
कार मालक विनय शर्मा आणि वसुली पथक यांच्यात काही वादावादी झाली. यावेळी आजूबाजूचे लोक हा वाद पाहत उभे राहिले आणि व्हिडिओ बनवत राहिले होते. लोक म्हणतात की, कार मालक विनय शर्मा कर्ज वसुली पथकावर खूप नाराज झाला होता.
दरम्यान, वसुली पथकाने व्हिडिओ बनवताच आता कार घेऊन जा, असे म्हणत विनय शर्मा याने कारवर पेट्रोलची बाटली फेकली आणि आग लावली. या घटनेचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांनी कार मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. तसेच, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.