ठाणे: मोटारकारच्या चोरीसह भाडेतत्वावरील वाहने घेऊन त्यांचा अपहार करुन लाखोंची फसवणूक करणाऱ्या परवेझ इक्बाल सैयद (३४, रा. मुंबई , मुळ रा. लोहियानगर, हुबळी, कर्नाटक) या अट्टल चाेरटयाला कर्नाटक येथून तर त्याचा साथीदार फयाझ अहमद मोहिब्बुल हक (५४, रा. कुर्ला, मुंबई) याला मुंबईतून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी सोमवारी दिली. त्याच्याकडून सहा वाहने आणि मोडीत काढलेल्या चार वाहनांचे इंजिन असा २१ लाख दहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कापूरबावडी पोलीस ठाण्यात अलिकडेच मोटारवाहन चोरीचा एक गुन्हा दाखल झाला होता. परिसरातील वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांचे एक पथक निर्माण केले होते. या पथकाने सलग पाच दिवस अथक परिश्रम घेऊन ठाणे, कल्याण, सातारा, कोल्हापूर, हुबळी (कर्नाटक) येथे जाऊन तेथील भागातील सीसीटिव्ही फुटेज, मोटारकारचे गॅरेज मेकॅनिक, स्थानिक नागरिक आणि तांत्रिक तपास करून हुबळी येथून परवेझ सैयद याला १२ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतून चोरी केलेल्या एका मोटारकारसह ताब्यात घेतले. त्याने मोटारकारच्या चोरीची कबूली दिल्यानंतर त्याला १३ सप्टेंबर रोजी अटक केली. न्यायालयाने त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
वाहने भाडेतत्वावर घेऊन केली फसवणूक
अटक केल्यानंतर परवेझ याने पोलिसांना कबूली दिली की, त्याने अशाच प्रकारे इतरही मोटारकारची चोरी केली. त्याचबरोबर नागरिकांना अधिक भाडयाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वाहने भाडेतत्त्वावर घेऊन त्या इतर लोकांना खोटी कारणे सांगून त्यांची विक्री केल्याचेही उघड झाले. यातील काही वाहने त्याने फयाझ अहमद मोहिब्बुल हक याला भंगारामध्ये विक्री केली. फयाझ याचाही या गुन्हयात सहभाग उघड झाल्याने त्यालाही या गुन्हयात अटक केली आहे.
मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईतील १२ गुन्हे उघड
याच चोरीच्या तपासात परवेझ याच्याकडून मुंबईतील सहार, मुलूंड चार तसेच ठाण्यातील कापूरबावडी, कळवा, मुंब्रा असे सात आणि नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीमधील एक असे १२ गुन्हे उघड झाले आहेत. या तपासात सहा मोटारकार आणि चार भंगारातील वाहनांचे इंजिनसह सुटे भाग असा २१ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.