योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मौजमजेसाठी चक्क कार आणि दुचाकी चोरून त्यावर ‘स्टाईल’ मारणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.
बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रचना अपार्टमेंट येथून स्वप्निल शेंडे (वय ३८) यांच्या मालकीची मारुती व्हॅन १६ डिसेंबर रोजी घराच्या पार्किंगजवळून चोरी झाली. शेंडे यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाकडूनदेखील समांतर तपास सुरू होता. सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याची बाब समोर आली.
पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. विचारणा केली असता, त्याने कार चोरल्याची कबुली दिली. तसेच २९ नोव्हेंबर रोजी रात्री प्रतापनगरातील कामगार कॉलनीतून यश बन्सोड याची दुचाकीदेखील चोरल्याची माहिती दिली. त्याच्यावर याअगोदरदेखील दोन वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कुटुंबात आई आणि भावंडं आहेत. आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. अल्पवयीन मुलाला नवीन वाहनाने रस्त्यावर फिरण्याची आवड आहे. यामुळे तो वाहन चोरतो. शेंडे यांची व्हॅन चोरून फिरायला नेल्यानंतर त्याने ती लपवून ठेवली. पोलिस निरीक्षक सुहास चौधरी, राजेंद्र गुप्ता, नितीन वासनिक, योगेश शेलोकार, सोनू भावरे, रितेश तुमडाम, योगेश वासनिक, स्वप्निल खोडके यांच्या पथकाने ही कारवाई केली.