मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गर्दी कमी व्हावी यासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलत राज्यातील महत्वाची शहरे आणि जिल्ह्याच्या सिमा बंद करून संपूर्ण राज्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तरीसुद्धा नागरीक स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेची काळजी न घेता, जमावबंदीचे आदेश धुडकावून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळेच पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. २३ ते २४ मार्च दरम्यान जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११२ गुन्हे दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले.
यात कोरोना संदर्भात २, हॉटेल आस्थापना १६, पान टपरी ६, इतर दुकाने ५३, हॉकर्स/ फेरीवाले १६, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी १० तर अवैध वाहतूक प्रकरणी १६ गुह्यांचा समावेश आहे. नागरिक मंगळवारी देखील बाहेर पडताना दिसून आले. त्यामुळे पोलिसांकड़ून त्यांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा कठोर पावले उचलावी लागतील असेही त्यांना सांगण्यात येत आहे.