मनिषा म्हात्रे
मुंबई - मागील काही दिवसांपासून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. SRA मधील घोटाळ्याबाबत सोमय्या सातत्याने पेडणेकर यांच्यावर आरोप करत आहेत. त्यातच आता किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सोमय्यांनी ट्विट करून दिली.
किरीट सोमय्या यांनी ट्विट करून म्हटलंय की, किशोरी पेडणेकर यांच्या किश कॉर्पोरेट कंपनी, एम पी एंटरप्राईस, बेस्ट ( मुंबई महापालिका) व अन्य कंपन्या विरुद्ध १००० कर्मचाऱ्यांची फसवणूक करणे, पगार न देणे, प्रोविडन्ट फंड हडप करणे त्याविरोधात कलम 406,409,34 भा दं वि अंतर्गत कुलाबा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे आरोप?पेडणेकरांच्या कंपनीविरोधात कर्मचारी ऋषिकेश कदम यांनी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटलंय की, मी पूर्वी बृहनमुंबई महानगरपालिकेच्या BEST विभागांतर्गत वडाळा डेपोमध्ये कंत्राटी पध्दतीने बस चालक म्हणून कार्यरत होतो. एप्रिल २०२१ मध्ये बेस्ट विभागात कंत्राटी पध्दतीवर चालक भरती सुरु असल्याची माझ्या मित्राकडून माहिती मिळाली. मी बांद्रा बस डेपो येथे जाऊन एम.पी. एंटरप्रायजेस अॅण्ड असोशिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांचेसमक्ष मुलाखत व चाचणी दिली होती. तेव्हा माझी बस चालक म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर दिंडोशी डेपो येथे तीन दिवसांचे प्रशिक्षण होऊन माझी चालक म्हणून वडाळा डेपो येथे नियुक्ती करण्यात आली होती. मला पगार म्हणून 21144/- रुपये दाखविण्यात आला होता. तर माझा भविष्य निर्वाह निधी व EISI कटींग करून सुमारे 18,144/- रुपये हातात मिळत असे.
सुरुवातीस नोव्हेंबर २०२१ पर्यंत ह्युमनिक कंपनीकडून आमचा पगार व कटींग वेळेवर होत असे. परंतु ए. पी. एंटरप्रायजेस अॅण्ड असोशिएशन प्रायव्हेट लिमिटेड हि मुळ कंत्राटदार कंपनी असल्याचे मला माहिती झाले होते. हयुमनिक कंपनीने मला मे २०२१ ते नोव्हेंबर २०२१ पगार दिला त्याची स्लीप माझ्याकडे आहे. त्यानंतर अचानक ह्युमनिक कंपनीचे काम बंद होऊन आमच्या पगाराचा सर्व कारभार मूळ कंपनीने ताब्यात घेतला होता. डिसेंबर २०२१ पासून माझा नमुद काळातील भविष्य निर्वाह निधी व ई.एस. आय, सी. माझ्या पगारातून कापून घेतला जात होता परंतु मला पगाराची स्लीप मिळत नव्हती. त्यानंतर UAN नंबर टाकून पाहिले तर तेव्हा कंपनीकडून भरणा होत नसल्याचे निदर्शनास आले असा आरोप करण्यात आला आहे.