मीरारोड - मोठ्या अनामत रकमेवर घर देतो सांगून १६ लाख ६० हजार रुपयांची ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या इस्टेट एजंट व त्याच्या पत्नीविरुद्ध काशीमीरा पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
समीर म्हसकर यांना मीरारोड भागात मोठ्या अनामत रकमेवर घर भाड्याने घ्यायचे असल्याने डिसेंबर २०२० मध्ये नया नगर , हैदरी चौक येथील पूनम पार्क मध्ये लकी होम्स इस्टेट एजंट खलीलुल्लाह खान यांची ओळख झाली. खान यांनी स्वतःचे व पत्नी अख्तरीचे मालकीचे एक घर असून मन ओपस विकासकाच्या संकुलातील घर आणि कागदपत्रे म्हसकर यांना दाखवली. फेब्रुवारी मध्ये १५ लाख रुपये अनामत रकमेवर घर भाड्याने देण्याचा करारनामा करून म्हसकर यांनी १० लाख ६७ हजार रुपये इतकी रक्कम जमा केली.
नंतर मात्र विकासकास पूर्ण पैसे देणे बाकी असल्याने घराचा ताबा पत्र दिले नसल्याचे कारण सांगून म्हसकर यांना घर देण्यास टाळाटाळ सुरु केली. खान दाम्पत्याने खोटे सांगून आपल्या कडून पैसे घेतल्याचे म्हसकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पैसे परत मागितले असता पैसे खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसात तक्रार करतो सांगताच, तक्रार देवु नका लवकरच तुमचे पैसे परत करु. तोपर्यंत तुम्ही दुस-या भाड्याच्या घरात रहा आणि त्या घराचे भाडे आम्ही देवु असे आश्वासन दिले व तसा करार केला.
काही दिवसांनंतर खान दाम्पत्याने म्हसकर यांना सांगितले की, बिल्डर पाच लाख घेवुन घराचा ताबा दयायला तयार असल्याने ती रक्कम दिली तर त्या घराचा ताबा देऊ. त्यांच्यावर विश्वास ठेऊन म्हसकर यांनी आणखी ५ लाख दिले व मे महिन्यात तसा आणखी एक करार केला. तरी देखील घराचा ताबा न दिल्याने म्हसकर यांनी पैश्यांची मागणी केली. खान दाम्पत्याने ३० जूनपर्यंत घराचा ताबा न देऊ शकल्यास पैसे परत देतो असे लेखी लिहून देत पुढील तारखांचे १६ लाख ५० हजार व ६० हजार रकमेचे दोन धनादेश दिले . पण ते देखील न वटल्याने अखेर म्हसकर यांनी ३१ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.