लोकमत न्यूज नेटवर्कपरळी (जि. बीड) : शांता राठोड यांनी आपल्या कुटुंबीयांवर पाच कोटी घेतल्याचे केलेले आरोप चुकीचे व खोटे आहेत. केवळ आपल्या कुटुंबाची बदनामी करण्याचे कारस्थान शांता राठोड यांनी रचले आहे. त्यांच्याविरुद्ध कलम ५००, ५०१, ५०२ भादंवि व कलम ६६ (अ) माहिती व तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी तक्रार पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी मंगळवारी परळी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून शांता राठोड यांच्याविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, राठोड यांनी पाच कोटी रुपये दिल्याचा केलेला आरोपही लहू चव्हाण यांनी फेटाळून लावला आहे. तक्रारीत लहू चव्हाण म्हणाले की, काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी असे करत आहेत. माझ्या मुलीची नाहक बदनामी केली जात आहे. त्यामुळे मी स्वतः २८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कारवाई होईल, असे सांगितले आहे. १ मार्च रोजी शांता राठोड यांनी टीव्हीच्या माध्यमातून आमच्या मुलीशी काही संबंध नसताना स्वतःहून बदनामी करण्याच्या हेतूने खोटे आरोप केले आहेत.
मी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. तसेच मला कोणी दडपण्याचा प्रयत्न केला नाही अथवा पैसे घेण्याचे कुणीही आमिष दाखवलेले नाही, याउलट मी माझ्या मुलीच्या दुःखात असतानासुद्धा मला बदनाम करण्याच्या दृष्टीने काही जणांनी प्रयत्न केले आहेत. शांता राठोड यांचा माझ्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही.- लहू चव्हाण, पूजा चव्हाणचे वडील
पुणे पोलीस आयुक्तांची चुप्पीपुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. पूजा चव्हाण हिचा ७ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणात वानवडी पोलीस तपास करीत आहेत. अजूनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. पूजा चव्हाण हिच्या शवविच्छेदन अंतिम अहवालात काय म्हटले आहे, असे प्रश्न विचारले. त्यावर आयुक्त गुप्ता हे केवळ हसून काहीही न बोलता पत्रकार परिषद संपवून निघून गेले.