मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या महेश नगर - २ या इमारतीच्या तीन मजल्यापर्यंतच्या सामूहिक बाल्कनीचा भाग मंगळवारी पहाटे कोसळल्यानंतर धोकादायक व जीर्ण असलेली ही संपूर्ण इमारतच पालिकेने तोडण्यास घेतली. त्यावेळी पालिकेच्या कामात अडथळा आणून अधिकाऱ्यास धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याने भाजपा नगरसेविकेच्या पतीसह ४ रहिवाशांविरुद्ध पालिकेने भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
महेश नगर क्रमांक २ ही १९७५ सालची चार मजली इमारत आहे. तिची शिवम गृहनिर्माण संस्था म्हणून नोंदणी आहे. प्रभाग समिती कार्यालयाने इमारतीच्या अध्यक्ष व सचिवांना स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे पत्र देऊन सुद्धा ते करण्यात आले नाही. सदर इमारत जीर्ण अवस्थेत असली तरी त्यात राहणाऱ्या कुटूंबियांनी थोडीफार डागडुजी व रंगरंगोटी करून त्यात राहत होते. ३९ सदनिका आणि १० दुकाने असून यातील ३ सदनिका बंद होत्या तर ३६ सदनिकांमध्ये लोक राहत होते.
चक्रीवादळाने जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह पडत असल्याने मंगळवारी पहाटे सुमारे ५.३५ वाजता इमारतीच्या पहिल्या ते तिसऱ्या मजल्यावरील सार्वजनिक बाल्कनीचा काही भाग पडला कोसळल्या. जिन्याच्या समोरचा भाग पडल्याने लोक अडकले. अग्निशन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे व जवानांनी इमारतीत अडकलेल्या ७२ जणांना आधी बाहेर काढले. त्यानंतर त्यांचे महत्वाचे सामान तेवढे काढून देण्यात आले. परंतु अग्निशन दलाच्या लोखंडी जिन्यावरून बहुतांश सामान खाली उतरवणे अशक्य होते. त्यातच जिन्या तुन जाताच येत नसल्याने आणि इमारत वा त्याचा भाग पडण्याची भीती असल्याने पालिकेने इमारत पडण्यास घेतली.
रहिवाशी हर्ष कल्पेश शाह यांनी खोलीतील महत्वाची कागदपत्रे व सोन्याचे दागिने असल्याने ते आणू द्या असा आग्रह धरला हर्ष हा दागिने व कागदपत्रे घेऊन येतो सांगून अग्निशमन दलाच्या शिडीने खोलीत गेला तो परत आला नाही. जवानांनी वर जाऊन पहिले असता हर्ष छताचा पंखा काढत होता. त्यावरून अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण यांनी खोटे बोलून जीव धोक्यात घालता असे सुनावले असता भूपतानीसह हर्ष, र्यन उन्मेष शाह (२०), मित उन्मेष शाह (२१) व उन्मेष जसवंतलाल शाह (५०) यांनी आपत्तीव्यवस्थापनाच्या कामात अडथळा आणून चिथावणी, धक्काबुक्की, शिवीगाळ केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.