शिर्डी : साई संस्थानचे अध्यक्ष असलेले जिल्हा मुख्य न्यायाधीश यांचे साई मंदिराची पाहणी करत असतानाचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमात व्हायरल करुन तदर्थ समितीची बदनामी केल्याप्रकरणी साई संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना मंगळवारी (दि.२१) अटक केली. (A case has been registered against a journalist and five employees for viralizing footage of a Sai temple)
संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागप्रमुख विनोद कोते, पत्रकार राहुल फुंदे, संस्थान कर्मचारी पतपेढीचे कर्मचारी अजित जगताप, सचिन गव्हाणे व कर्मचारी चेतक साबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
३१ जुलै रोजी साई संस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर जिल्हा प्रधान न्यायाधीश व तदर्थ समितीच्या सदस्य असलेल्या सहायक धर्मादाय आयुक्त यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर मंदिराची पाहणी केली होती. अध्यक्ष व समितीच्या सदस्यांनी कोविड नियमांचा भंग केल्याची व मंदिर बंद असताना दर्शन कसे घेतले, अशी बातमी एका यूट्यूब चॅनेलने प्रसिद्ध केली होती. यात मंदिरातील फोटो व सीसीटीव्ही फुटेजही वापरण्यात आले होते. यामुळे भाविकांमध्ये गैरसमज पसरला. तसेच बदनामी झाल्याप्रकरणी अध्यक्षांनी संस्थानच्या सुरक्षा प्रमुखांना चौकशीचे आदेश दिले होते.
संबधितांनी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याच्या हेतूने हे कृत्य केले असून यामुळे मंदिर सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला, हे सर्व करत असताना हार्डडिक्समधील फोटो डिलिट करण्यात आले. संगणकातील फुटेज घेऊन त्यात छेडछाड केल्याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी साई मंदिर सुरक्षा प्रमुख हर्षवर्धन गवळी यांनी फिर्याद दाखल
केली. त्यावरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.