मीरारोड - राष्ट्रध्वज सन्मानाने न उतरवता तसाच ठेवून अवमान केल्याप्रकरणी मीररोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या दोघा पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी सुका गुप्ता व स्टँड प्रमुख रामकृपाल मौर्या यांनी १५ ऑगस्ट रोजी सकाळी मीरारोडच्या लोढा मार्ग जवळील सार्वजनिक ठिकाणी संघटनेच्या फलका जवळ ध्वजारोहण केले होते. त्याच दिवशी सायंकाळी मानवंदना देऊन ध्वज उतरवायचा असताना दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्ट च्या सायंकाळ पर्यंत ध्वज उतरवला नव्हता. सदर बाब वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम खान यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी त्वरित नयानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना माहिती दिली.
वनकोटी यांनी लगेच पोलीस निरीक्षक सय्यद जीलानी सह बाबुराव गरुड, गोमासे, आनंदा जाधव व सुभाष चव्हाण अश्या पोलीस पथकास घटनास्थळी पाठवले. पोलिसांनीराष्ट्रध्वजाला रीतसर मानवंदना देऊन तो खाली उतरवला. पोलिसांनी स्वतःच फिर्याद देऊन गुप्ता व मौर्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर आदर्श ध्वजसंहिता व राष्ट्रीय ध्वज अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे.