मीरारोड - भाईंदरमधील एका सदनिकेत लोटसबुक गेम ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून क्रिकेटवर सट्टा चालवणाऱ्या दोघांवर गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल केला असून मोबाईल आदी मुद्देमाल जबर करण्यात आला आहे .
परीमंडळ १ चे पोलीस उपआयुक्त अमित काळे यांना माहिती मिळाली की, भाईंदर पश्चिमेच्या ९० फुटी मार्गावरील सुवर्ण प्लाझा इमारतीत ब्रिजेश भट नावाचा इसम सदनिकेतून क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा चालवत आहे . त्यांनी सपोनि प्रशांत गांगुर्डे व दत्तूसाहेब लोंढे सह विश्वनाथ जरग , समीर यादव, सनी सुर्यवंशी, एम ए सावंत यांच्या पथकास कारवाईसाठी पाठवले . पोलीस पथकाने धाड टाकली असता सदनिकेत मोबाईल मधील इंटरनेट ब्राउझर द्वारे लोटसबुक गेम संकेतस्थळावरून मेलबर्न स्टार विरूद्ध एडीलेट स्ट्रायकर (बिग बश लिग) २० - २० ओव्हर क्रिकेट मॅच सुरु असल्याचे आढळले . ते लाईव्ह मॅच पाहून त्यावर बेटींग चालू होते.
सट्टा व्यवहाराची रक्कम जमा होऊन ठरलेल्या टक्केवारीनुसार रक्कम मिळत असल्याचे ब्रिजेश भट रा. साईसावली, पोस्ट ऑफिस समोर, भाईंदर याने पोलिसांना सांगितले . हितेन कुमार पटेल ह्याने ५० हजार अनामत रक्कम ठरवून गेल्या ६ महिन्यां पासून क्रिकेट मॅच वर सट्टा खेळत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भट ह्याला अटक करून भाईंदर पोलीस ठाण्यात १० रोजी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत.