मुंबई : लोकल ट्रेनमध्ये नशा करत असलेल्या तरुणाला जाब विचारल्यामुळे त्याच तरुणाने महिला पोलिसाची छेड काढल्याचा गंभीर वडाळा रेल्वे स्थानकावर घडला. हा प्रकार घडल्यानंतर महिला पोलिसाने या तरुणाला चांगलाच चोप दिला. तरुणाला मारतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. महिला पोलिसाची छेड काढणाऱ्या या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण ट्रेनच्या गेटवर उभा राहून नशा करत होता. तरुणाला नशा करताना पाहून महिला कॉन्स्टेबलने त्याला ट्रेनमधून खाली उतरण्यास सांगितलं. पण हा तरुण ऐकायला तयार नव्हता. ट्रेन चालू होणार तरीही हा तरुण खाली उतरायला तयार नव्हता, अखेर यावरुन महिला कॉन्स्टेबल आणि तरुणामध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर या युवकाने महिला कॉन्स्टेबलला उलट-सुलट बोलायला सुरुवात केली.
चालत्या ट्रेनमध्ये या संबंधित युवकाने महिला कॉन्स्टेबलला छेडछाड केली. या युवकाला सरळ करण्यासाठी अखेर महिला कॉन्स्टेबलने काठीने त्याला चोप दिला. अखेर वडाळा रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार या नशेत धुंद असलेल्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. वडाळा रेल्वे पोलिस या युवकावर पुढील कारवाई करत आहेत. त्यामुळे युवकाला महिला कॉन्स्टेबलसोबत अशाप्रकारे गैरवर्तन करणं महागत पडल्याचं दिसून आलं.