हडपसर : पाळीव कुत्रा दगावल्यामुळे श्वान मालकाने पाठपुरावा करून चुकीचे उपचार करणाऱ्या व विनापरवाना पशु चिकित्साल चालविणाऱ्या दोन पशूवैदयकीय डॉक्टर व एका सहाय्यकाविरूध्द हडपसर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा व चुकीचे उपचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अशी माहिती अशी, याप्रकरणी डॉ. अनिल रामकृष्ण देशपांडे (वय 47, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. तर डॉ. दिलीप सोनुने, डॉ अपुर्वा गुजराथी व सहाय्यक श्रीमती इशीतलाल अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी तुकाईदर्शन येथील योगेश गवळी यांचे श्वान आजारी पडले होते. त्यामुळे त्यांनी डीपी रोड येथील माय पेट केअर या पशुवैदयकीय दवाखान्यात त्याला उपचारासाठी नेले. तेथे डॉक्टर उपल्बध नसताना सहायकाने चुकीचे उपचार केले.दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास श्वानाचा मृत्यू झाला. त्यानंतर गवळी यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी औंध येथील शासकीय पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे पंचनामा केला. त्यावेळी सदर श्वानाचा कावीळ झालेली होती. मात्र त्याच्यावर गॅस्ट्रोचे उपचार करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. हडपसर पोलिसांनी पुढील तपास केला असता सदर दवाखान्यास नागपूर येथील पशुवैदयकीय कौन्सीलची मान्यता नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी दवाखाना सील करून संबधित दोषी असलेल्या तिघांवर गुन्हा दाखल केला. विनापरवाना दवाखाना सुरू केल्याप्रकरणी डॉक्टरांचा परवाना देखील रद्द करण्यात आला आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हेमचंद्र खोपडे, सहाय्यक निरिक्षक किरण लोंढे, बजरंग धायगुडे यांनी याप्रकरणी तपास केला.याबाबत श्वान मालक योगेश गवळी म्हणाले, ''श्वानाचे वय दिड महिन्याचे होते. आम्ही घरातील सर्वजण त्याची प्रेमाणे काळजी घेत होतो. घरातील थोरा-मोठयांना त्याचा लळा लागला होता. अचनाक त्याचा मृत्यू झाल्याने सर्वांना हळहळ वाटत आहे. श्वानाच्या प्रेमापोटीच पाठपुरावा करून दोषी डॉक्टर व विनापरवाना डॉक्टरांना अद्दल घडावी यासाठीच पोलीस ठाण्यात तक्रार दिली.''
हडपसर येथे कुत्र्यावर चुकीच्या उपचार केल्यामुळे दोन डॉक्टरांसह सहायकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 7:30 PM
पाळीव कुत्रा दगावल्यामुळे श्वान मालकाने चुकीचे उपचार करणाऱ्या पशूवैदयकीय डॉक्टर व एका सहाय्यकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देपोलिसांनी औंध येथील शासकीय पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे केला पंचनामा विनापरवाना दवाखाना सुरू केल्याप्रकरणी डॉक्टरांचा परवाना देखील रद्ददोषी डॉक्टर व विनापरवाना डॉक्टरांना अद्दल घडावी यासाठीच पोलीस ठाण्यात तक्रार