भिवंडी - भिवंडीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात दोघा नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.
दरम्यान पीडित मुलगी हि अल्पवयीन असल्याने या मुलीस व तिच्या परिवारास न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा तसेच त्याचा निकाल सहा महिन्यांच्या आत लावावा व पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने तसेच तिचे पालक हे आरोपींच्या दहशतीखाली असल्याने या पीडित कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे, पीडित मुलगी शिक्षण घेत असल्याने तिच्या शिक्षणाची जबाबदारी शासनामार्फत घेण्यात यावी व पीडित मुलीला केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ तसेच राज्य शासनाच्या संबंधित योजनांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे . दरम्यान आपल्या निवेदनाची दखल घेत गृहमंत्र्यांनी गृह विभागाचे उपसचिव व ठाणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात चौकशीचे आदेश देखील दिले असून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली आहे.