वसई - वसई विरार महापालिकेचे नगरसेवक धनंजय गावडे यांच्या विरोधात एका महिलेने तुळींज पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून तसेच अश्लिल चित्रफित प्रसारीत करण्याची धमकी दिल्याचा आरोप या महिलेने गावडे यांच्यावर केला आहे. या तक्रारीनंतर गावडे यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहित पोलीस उपनिरीक्षक भरत साळुंखे यांनीही 'लोकमत'शी बोलताना दिली.
वसई विरार महापालिकेतील शिवसेना नगरसेवक यांच्यावर वसईतील विविध पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. तेव्हापासून ते फरार आहेत. रविवारी रात्री त्यांच्यावर नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. नालासोपार येथील एका ३४ वर्षीय राजकीय पक्षाच्या महिलेने ही तक्रार दिली आहे. २०१६ मध्ये गावडे यांनी आपल्या कार्यालयात जबरदस्तीने बलात्कार केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. यावेळी पिस्तुलाचा धाक दाखवून अश्लिल चित्रफित इंटरनेटवर प्रसारीत कऱण्याची धमकी दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर तुळींज पोलिसांनी गावडे यांच्यावर बलात्कार आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राजकीय सूडबुध्दीने ही तक्रार करण्यात आली का? या सर्व बाजूने पोलिसांचा तपास सुरु आहे. गावडे यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ३७६, ५०६ आणि शस्त्रास्त्र कायदा ३, २५ अन्वये हा गुन्हा दाखल आहे.