डोंबिवली - महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा परिसरात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम निरंतर सुरू आहे. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा न करणाऱ्या ४७ जणांविरूद्ध वीज कायदा २००३ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडील १४ लाख ६८ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली. मांडा शाखा कार्यालयांतर्गत विनायक कॉलनी, सांगोडा रोड, साईबाबा कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, साईप्रसाद चाळ, वैष्णवी चाळ आदी भागात महावितरणच्या पथकाने ग्राहकांच्या वीजजोडण्यांची तपासणी केली. यात ४७ जणांकडून वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले.
सर्वांना वीजचोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्याबाबत नोटिस बजावण्यात आली. परंतू विहीत मुदतीत सदर रकमेचा भरणा न झाल्याने मांडा शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता निलेश महाजन यांनी मुरबाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुरबाड पोलिस ठाण्यात ९ नोव्हेंबरला ४७ जणांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या दीड महिन्यात मांडा शाखा कार्यालयांतर्गत ४१ लाख १८ हजार रुपयांच्या वीजचोरी प्रकरणी १४० जणांविरुद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असल्याचे गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. उपविभागीय अभियंता गणेश पवार व सहायक अभियंता निलेश महाजन व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आलेआहे.