विरार - वालीव पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण शाखेचा पोलीस शिपाई आणि एक खाजगी तरुण असा एकूण 3 लोकांवर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्याने पालघर जिल्ह्यातील पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली आहे. वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल करत खाजगी तरुणाला अटक केले असून दोन्ही फरार आरोपी पोलिसांचा कसून शोध घेत तपास करीत आहे. या आठवड्यात दोन वेळा पोलिसांवर गुन्हे दाखल झाल्याने जणू वालीव पोलीस ठाण्याला ग्रहण लागले असल्याचे बोलले जात आहे.वालीव पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकून सहाय्यक फौजदार शरीफ रमजान शेख याने चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेल्या मुद्देमालामधील 2 करोड 16 लाख रुपयांच्या विदेशी सिगारेट चोरी करून विकल्याचा प्रताप उघडकीस आल्यावर 11 सप्टेंबरला गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. याच गुन्ह्याचा तपास वसई पोलीस उपअधीक्षक डॉ. आश्विनी पाटील या करत असताना दोन खबऱ्यांना पकडले होते व तिथूनच हा गौप्यस्फोट झाला आहे. एका खबऱ्याने पोलीस तपासात माहिती दिली की, ऑगस्ट महिन्यांमध्ये ड्रग्स माफिया मुंबई अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलच्या परिसरात ड्रग्स विकायला येणार असल्याची माहिती वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण आणि पोलीस शिपाई भीमगोंडा व्हसकोटी यांना दिली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून विकायला आलेल्या आरोपीला पकडून त्याच्याकडून हिरोईन नावाचे अमली पदार्थ जप्त करत त्याच्यासोबत आर्थिक व्यवहार करून त्याला सोडून देण्यात आले होते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना कल्पना दिल्यावर त्यांनी दिलेल्या आदेशावरून दोन्ही पोलीस आणि खाजगी तरुण निखिल गिरीधर ठाकूर (30) या तिघांविरोधात अमली पदार्थांचा गुन्हा दाखल केला आहे. निखिल याच्या बॅगेची पोलिसांनी झाडाझडती घेतल्यावर 75 हजार रुपयांचे 14 ग्रॅम हिरोईन प्लास्टिक पिशवीमध्ये सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस शिपाई व्हसकोटी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे तर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण याची बढती होऊन सहायक पोलिस निरीक्षक म्हणून नागपूरला बदली झालेली आहे.
वालीव पोलीस ठाण्याला लागले ग्रहण; तत्कालीन उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 4:15 PM
वालीव पोलीस ठाण्याला ग्रहण लागले असल्याचे बोलले जात आहे.
ठळक मुद्देअमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्याने पालघर जिल्ह्यातील पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली आहे. विदेशी सिगारेट चोरी करून विकल्याचा प्रताप उघडकीस आल्यावर 11 सप्टेंबरला गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.