गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - सोसायटीतील वादातून महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताचे वकील अॅड. नितीन सातपुते यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा सगळा बदनामीचा प्रकार असल्याचा सातपुते यांचा दावा आहे.विजया ( नावात बदल ) ही महिला माहीमच्या ओम सिद्धिविनायक को. ऑप सोसायटीमध्ये राहते. याच सोसायटीत अॅड. सातपुते राहतात. तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ३० सप्टेंबर, २०१९ मध्ये या सोसायटीची मिटिंग घेण्यात आली होती. सातपुते हे तळमजल्यावर राहत असुन त्यांच्या घरासमोर गार्डन आहे. या गार्डनचे लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान बनवण्यात यावे, अशी विनंती विजयाने मिटिंगदरम्यान केली. याचा राग ऍड सातपुते यांच्या मनात होता, त्यातूनच २ नोव्हेंबर, २०१९ रोजी फोन करुन शिवीगाळ केली.
याप्रकरणी महिलेने माहीम पोलिसात तर ४ नोव्हेंबर २०१९ रोजी तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. २७ नोव्हेंबर, २०१९ रोजी याबाबत बार असोसिएशन- वांद्रे, पोलीस आयुक्त मुंबई, बार कौन्सिल ऑफ मुंबई व गोवा हायकोर्ट, माहिम पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. महिला आयोग वांद्रे याठिकाणी १६ डिसेंबर, २०१९ साली संयुक्त मीटिंग आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या मिटिंगला अॅड. सातपुते गैरहजर होते. त्यानंतर ३० डिसेंबर, २०१९ ला पुन्हा महिला आयोगाच्या म्हाडा कार्यालयात विजया हजर होत्या. त्यावेळी सातपुते यांनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. याची तक्रार त्यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात केल्यानंतर याप्रकरणी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा तर बदनामीचा प्रकार - अॅड. नितीन सातपुतेमी संबंधित महिलेच्या विरोधात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करविला आहे. त्यांनंतर तिने माझ्या विरोधात खोटा आरोप करत गुन्हा दाखल करविला. जे काही घडले ते सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. हा सर्व निव्वळ बदनामीचा प्रकार असून सत्य लवकरच उघड होईल.