औरंगाबाद : विनापरवाना बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेले शुभम् सूर्यकांत सुरळे (२३), अजिंक्य शशिकांत सुरळे (१८) आणि रोहित राजेश रेगे (२२) यांच्या पोलीस कोठडीत २७ आॅगस्टपर्यंत वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.एम. चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.२४ आॅगस्ट) दिला.
वरील तिघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. सिटीचौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस.व्ही. तायडे यांनी रिमांड यादी सादर करून आरोपींना वाढीव पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता योगेश तुपे पाटील यांनी न्यायालयास विनंती केली की, अटक आरोपींकडून जप्त केलेली शस्त्रे बाळगण्याचा त्यांचा नेमका काय उद्देश होता, त्यांच्याकडे अशाप्रकारची आणखी शस्त्रे आहेत काय, ती कोठे लपवून ठेवली आहेत, त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत, ते जाणीवपूर्वक ही माहिती लपवीत आहेत, आरोपींनी जप्त शस्त्रांचा वापर करून यापूर्वी कोणते बेकायदेशीर, समाजविघातक कृत्य करण्यासाठी वापर केला होता काय, सदर शस्त्रांचा भविष्यात कोठे वापर करण्याचे कटकारस्थान रचले किंवा कसे, याबाबत सखोल तपास करावयाचा आहे. आरोपी उच्च शिक्षित असून, तपासात ते सहकार्य करीत नाहीत. त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल तपास करण्यासाठी तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्याची विनंती त्यांनी केली.
तर आरोपींतर्फे अॅड. वर्षा घाणेकर आणि बलराज कुलकर्णी यांनी वाढीव पोलीस कोठडीला विरोध केला. आता आरोपींकडून काहीही जप्त करावयाचे नाही. सबब त्यांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असे सांगितले. उभय पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.