नवी मुंबई : तरुणावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासात पोलिसांपुढील कोडे अद्याप सुटलेले नाही. अशातच तो सागर विहार परिसरात आला असता, मध्यंतरीच्या अवघ्या काही वेळासाठी तो नेमका कुठे गेला याचे गुपीत उलगडलेले नाही. त्या ठरावीक वेळेव्यतिरिक्तच्या वेळेत तो परिसरातल्या सीसीटीव्हीतही दिसून आला आहे. त्याची प्रकृती पूर्णपणे सुधारत नाही, तोपर्यंत घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी होऊ शकत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.तुर्भे येथे राहणाऱ्या तरुणावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार व त्यानंतर अमानुष कृत्य केल्याची घटना वाशीतील सागर विहार परिसरात घडली आहे. या घटनेला आठवडा होत आला असून, त्या मागचे नेमके गुपीत अद्याप उघड होऊ शकलेले नाही. ज्या क्रूरतेने त्याच्यावर अत्याचार झाले आहेत, त्यावरून अत्याचार करणारे नशेत असावेत असा अंदाज लावला जात आहे. शिवाय ती समलैंगिकांची टोळी असावी, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार सर्वच बाजूंनी पोलिसांकडून तपासावर जोर दिला जात आहे. त्याकरिता परिसरातील तसेच मार्गावरील सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासण्यात आले आहेत. यामध्ये तो ६ वाजण्याच्या सुमारास सागर विहार परिसरात आल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्यानंतर काही वेळासाठी तो परिसरात दिसेनासा झाल्यानंतर त्याची मोटारसायकलही सीसीटीव्हीत दिसून आलेली नाही. मात्र, त्यानंतर रात्रीच्या सुमारास तो मोटारसायकलवरून कोपरखैरणेच्या दिशेने जाताना सीसीटीव्हीत दिसून येत आहे; परंतु या प्रकरणाच्या मध्यंतरीच्या वेळेत तो कुठे होता याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्याकरिता मोबाइल लोकेशनही तपासण्यात आले. मात्र, घटनेवेळी पाऊस असल्याने पीडित तरुणाने त्याच्याकडील मोबाइल व इतर वस्तू मोटारसायकलच्या डिकीमध्ये ठेवल्या होत्या, त्यामुळे अवघ्या काही मिनिटांचे गुपीत पोलिसांना उलगडलेले नाही. त्याकरिता पीडित तरुणाची प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यानंतर प्रत्यक्षात त्याला घटनास्थळी आणून पोलिसांकडून आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतरच संपूर्ण प्रकार स्पष्ट झाल्यानंतर तपासाला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.सागर विहार परिसरात रात्रीच्या वेळी अश्लील कृत्ये चालत असल्याच्या परिसरातील रहिवाशांच्या अनेक वर्षांपासूनच्या तक्रारी आहेत.मात्र, प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. यामुळे तिथल्या काळोखाचा फायदा प्रेमीयुगुलांकडून तसेच समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांकडून घेतला जात होता.अशातच तरुणासोबत घडलेल्या या प्रकरणानंतर अखेर प्रशासन जागे झाले आहे. त्यानुसार रविवारी त्या ठिकाणी पथदिव्यांसाठी खोदकाम सुरू असल्याचे दिसून आले.
वाशीतील प्रकरण : ‘त्या’ ठरावीक मिनिटांचे गुपीत उलगडेना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 3:02 AM