लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चेन्नईतील एका कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या स्थानिक शाखेत ३९ लाख रुपयांची अफरातफर झाली. गुरुवारी दुपारी या प्रकरणी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी कंपनीच्या स्थानिक शाखेत काम करणाऱ्या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.सतीश नारायण कावळे, सुमित प्रेमदास गजभिये आणि रोहित रमेश गणवीर अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघे लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर चौकात असलेल्या चेन्नईतील एका कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये नोकरीला होते. कंपनीशी संबंधित ग्राहकांकडून रोज रक्कम जमा करायची, ती कंपनीच्या कॅश होल्टमध्ये ठेवायची आणि नंतर दुसऱ्या दिवशी बँकेत जमा करायची, अशी या कंपनीची कार्यपद्धत आहे. कंपनीचे पुण्यातील अधिकारी शिवाजी हंबीर पाटील यांनी स्थानिक शाखेतील आरोपी सतीश कावळे याला २४ मे रोजी फोन करून कंपनीच्या तिजोरीत किती रोकड आहे, ते लाईव्ह सीसीटीव्ही फुटेज मेलद्वारे आम्हाला कळवा, असे म्हटले. यावेळी आरोपी कावळे यांनी कार्यालयातील सीसीटीव्ही खराब असल्याने ते शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर शिवाजी पाटील यांनी आरोपी कावळे, गजभिये आणि गणवीर या तिघांना वारंवार फोनवरून विचारपूस केली. मात्र ते समाधानकारक उत्तर देत नव्हते. कंपनीच्या तिजोरीत अंदाजे एक-दीड वर्षापासून रक्कम कमी आहे, असे सांगून ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे पाटील यांनी नागपूर शाखेचे असिस्टंट ऑपरेशन मॅनेजर गणेश महादेव पोखरकर यांना तिजोरीत किती रोकड आहे, ते प्रत्यक्ष तपासण्यास सांगितले. त्यानुसार पोखरकर यांनी काही दिवसांपूर्वी तपासणी केली असता कंपनीच्या तिजोरीत केवळ २ लाख, २०२६ रुपये आढळले. रजिस्टरच्या नोंदीप्रमाणे तिजोरीत एकूण ४१ लाख, ४ हजार ६३९ रुपये असायला पाहिजे होते. मात्र आरोपींनी त्यातील ३९ लाख, २ हजार, ६१३ रुपयांची अफरातफर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लकडगंज ठाण्यात या प्रकरणाची पाटील यांनी गगुरुवारी तक्रार नोंदविली. पोलिसांनी उपरोक्त तीन आरोपींविरुद्ध कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे मॅनेजमेंट गडबडले : ३९ लाखांची अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:58 PM
चेन्नईतील एका कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या स्थानिक शाखेत ३९ लाख रुपयांची अफरातफर झाली. गुरुवारी दुपारी या प्रकरणी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी कंपनीच्या स्थानिक शाखेत काम करणाऱ्या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देकंपनीतील अधिकाऱ्यांनीच लावला सुरुंग