भुवनेश्वर : ओडिशातील नवरंगपूर जिल्ह्यात झालेल्या एका चोरीची जाेरदार चर्चा सुरू आहे. ही चाेरी एका शाळेत झाली. मात्र, चाेरांनी फळ्यावर पाेलिसांसाठी निराेप लिहिला असून, आम्हाला पकडून दाखवा, असे आव्हान दिले आहे. त्यासाेबतच पुढे लिहिले आहे ‘धूम-४’. या घटनेमुळे पाेलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
नवरंगपूर येथील इंद्रावती हायस्कूलमध्ये चाेरी झाली. शाळेतून संगणक, झेरॉक्स मशीन, प्रिंटर व इतर मौल्यवान वस्तू चाेरल्याचे आढळले. दाेन शिक्षकांचा निराेप समारंभ आदल्या दिवशी झाला हाेता. त्यावेळी आणलेले संगीताशी संबंधित साहित्यही चाेरट्यांनी लंपास केले. मात्र, वर्गातील फळ्यावर लिहिलेल्या निरोपामुळे सर्वांनाच धक्का बसला. चाेरांनी ‘इट्स मी, धूम-४’ असे लिहून काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची आठवण करून दिली. आम्ही लवकरच परत येऊ, आम्हाला पकडू दाखवा, असे आव्हान चाेरांनी पाेलिसांना दिले. (वृत्तसंस्था)
पाेलिसांसमाेर आव्हानचाेरांनी पाेलिसांना आव्हान दिले आहे. पाेलिसांकडून चोरांना पकडण्यासाठी जाेरदार प्रयत्न सुरू आहेत. चोर कितीही हुशार असला तरी ताे पोलिसांपासून वाचू शकत नाही. आम्ही तपास करीत असून, लवकरच चोरांना गजाआड करू, असे खातीगुडा पाेलिसांनी सांगितले.
फळ्यावर लिहिले अनेक माेबाइल नंबरचाेरांनी फळ्यावर अनेक माेबाइल नंबरही लिहून ठेवले आहेत. त्यापैकी एक नंबर शाळेतील शिक्षकाचा आहे. मात्र, या चोरीशी आपला काहीही संबंध नसून, चाेरांनी माझा माेबाइल नंबर तिथे का लिहिला, हे मला माहिती नसल्याचे संबंधित शिक्षकांनी सांगितले.
जिल्ह्यातील तिसरी घटनाजिल्ह्यात अशा प्रकारची तिसरी घटना आहे. सर्वप्रथम टेंटुलीखुटी येथील शिक्षण विभागाचे कार्यालय आणि नंदाहांडी येथील एका शाळेतही अशाच पद्धतीने चाेरी केली हाेती.