नालासोपारा - नालासोपारा येथील ऍक्सिस बॅंकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली ३८ लाख रुपयांची रोकड लुटून पळालेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. आरोपी नालासोपारा येथे राहणारे असून कॅटरिंगचे काम करत होते. ८ जानेवारी रोजी नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे ऍक्सिस बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून ३८ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
हल्लेखोर ज्या गाडीतून आले होते ती गाडी पोलिसांनी घटनेच्या दोन तासांनंतर मिळाली होती. त्यावरून पोलिासंनी आरोपींचा पत्ता शोधला. आरोपी सुरेंद्र यादव गाडीचा चालक असून तो आपल्या साथीदार आणि कुटुंबियांसह फरार झाला आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आहे. मात्र गुरूवार संध्याकाळपर्यंत ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. आरोपी यादव याचा कॅटरिंगचा व्यवसाय होता. ज्या ठिकाणी तो कॅटरिंग करायचा त्या ठिकाणी एटीएम केंद्रात पैसे भरण्याचे काम करणाऱ्या सेफ गार्ड कंपनीचे कार्यालय होते. त्यामुळे आरोपी दररोज हे व्यवहार पाहत होता. त्याला किती कर्मचारी जातात, किती रोकड असते याची माहिती होती, असे पोलीस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी सांगितले. या प्रकऱणातील एका आरोपी गाडीचा चालक असून उर्वरित त्याचे साथीदार आहे. त्यांना लवकरात लवकर मुद्देमालासह अटक केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.