लातूर : महाराष्ट्र शासनाच्या करारानुसार प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत अधिकचे नुकसान दाखवून, जास्तीचा आर्थिक लाभ मिळवून देतो, असे म्हणून लाचेची मागणी करत साडेतीन हजार रुपये स्वीकारताना चाकूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी एकाला रंगेहाथ पकडले. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका कंपनीचा तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेला अंगद मोहनराव कांबळे (३६) आणि संदीप जालिंदर बानाटे (२८) या दोघांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या विम्याचा अधिकचा लाभ मिळवून देण्यासाठी, जास्तीचा आर्थिक लाभ देण्यासाठी मोबदला म्हणून ३ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
दरम्यान, तक्रारदाराने लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर चाकूर येथे पथकाने सोमवारी सापळा लावला. संबंधित तक्रारदाराकडून ३ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना बानाटे याला रंगेहाथ पकडले. बानाटे याने कांबळे यास लाच रक्कम स्वीकारल्याबाबत फोनवरून कळविले, अशी माहिती लातूरचे पोलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांनी दिली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे नांदेड पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरचे पोलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, अन्वर मुजावर, पोह. रमाकांत चाटे, फारुख दामटे, भागवत कठारे, पोना. संतोष गिरी, श्याम गिरी, पोकॉ. शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, दीपक कलवले, संदीप जाधव, मंगेश कोंडरे, गजानन जाधव, रुपाली भोसले, राजू महाजन यांच्या पथकाने केली.