नवी दिल्ली: देशातील वाढत्या चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या मुद्द्यावर सीबीआय अॅक्शन मोडमध्ये आली आहे. लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ बनवून शेअर केल्याप्रकरणी सीबीआय मंगळवारी सकाळपासून देशातील 76 ठिकाणी छापेमारी करत आहे. सीबीआय अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी 83 आरोपींविरुद्ध 23 एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या.
सीबीआयचे आरसी जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून देशातील विविध राज्यांतील 76 शहरांमध्ये ही छापेमारी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आज सकाळपासून मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिशा, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ही कारवाई करण्यात येत आहे.
लहान मुलांवरील सायबर गुन्ह्यांमध्ये 400% वाढ
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने अलीकडेच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये देशभरातील मुलांविरुद्ध होणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये 400% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. यापैकी बहुतेक प्रकरणे लैंगिक कृत्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीच्या प्रकाशन आणि प्रसारणाशी संबंधित आहेत.
यूपीमध्ये सर्वाधिक 170 प्रकरणे
2020 च्या NCRB डेटानुसार, उत्तर प्रदेश(UP) मध्ये मुलांविरुद्ध ऑनलाइन गुन्ह्यांची सर्वाधिक 170 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापाठोपाठ कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. 144 आणि 137 केसेस येथे दाखल झाल्या आहेत. या यादीत केरळ (107) आणि ओडिशा (71) चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.