मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला १४००० कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश देण्यात यावे अशी विनंती करणारा अर्ज केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.
विशेष न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्यासमोर दाखल केलेल्या या अर्जात सीबीआयने नीरव मोदी, त्याचा भाऊ निशल आणि नीरव मोदीच्या मालकीच्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह सुभाष परब याचे नावही नमूद केले असून या तिघांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याआधीच हे तीन आरोपी देश सोडून परदेशात पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्धचे वॉरंट एक्झिक्यूट झालेले नाहीत. यापैकी नीरव मोदी याला लंडन येथे अटक झाली असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रियाही भारताकडून सुरू आहे. मात्र, निशल आणि परब यांचा ठिकाणा अद्याप तपास यंत्रणेला लागलेला नाही. त्यामुळे या तिघांविरुद्ध प्रोक्लेमेशन (घोषित आरोपी) आणि मालमत्ता जप्तीचे आदेश जारी करण्यात यावेत अशी सीबीआयने मागणी केली आहे. या तिघांविरोधात कोर्टाने प्रोक्लेमेशन ऑर्डर काढून त्यांना ३० दिवसात कोर्टात हजर राहण्यास सांगावे अशी विनंती सीबीआयकडून कोर्टात करण्यात आली आहे. जर ते कोर्टासमोर ३० दिवसांत हजर राहिले नाहीत तर त्यांची संपत्ती जप्त करण्याच्या पुढील प्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल.