CBI Arrested 10 people from pune : देशातील आणि जगभरातील नागरिकांना जाळ्यात ओढून पैसे उकळणाऱ्या सायबर गुन्हेगारी नेटवर्कविरोधात सीबीयआने मोठी कारवाई केली. सीबीआयने २६ सप्टेंबर रोजी देशभरातील ३२ ठिकाणी छापे टाकले. सायबर फ्रॉडच्या माध्यमातून लोकांना फसवून पैसे उकळणाऱ्या नेटवर्कमध्ये १७० जण सहभागी असल्याचे समोर आले असून, २६ प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सीबीआयने पुण्यातून १० जणांना अटक केली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, जगभरातील लोकांना फसवून सायबर नेटवर्क चालवणाऱ्या नेटवर्कविरोधात कारवाई करत सीबीआयने अनेक शहरात छापे टाकले.
सीबीआयने कोणत्या शहरात टाकले छापे?
सीबीआयने पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आणि विशाखापटणमधील ३२ ठिकाणी छापे टाकले. २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री हे छापे टाकण्यात आले.
सीबीआयने केलेल्या छापेमारीमध्ये असे आढळून आले की, चार कॉल सेंटर्संच्या माध्यमातून १७० लोक या ऑनलाईन गुन्हेगारीच्या घटनांत सहभागी आहेत. यात प्रमुख आरोपी असलेल्या २६ जणांना सीबीआयने अटक केली आहे.
कोणत्या शहरातून किती आरोपींना अटक?
सीबीआयने अटक केलेल्या प्रमुख आरोपींपैकी १० जणांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. हैदराबादमधून ५ आरोपी आणि विशाखापटणममधून ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सायबर क्राइमसाठी वापरल्या जाणाऱ्या कॉल सेंटर्संमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा यात भूमिका काय आहे, याबद्दल आता सीबीआय तपास करत आहे.