मुंबई - मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात शीना बोरा हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने वैद्यकीय कारणासाठी जमीन अर्ज दाखल केला होता. आज या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली असता कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावला. इंद्राणी मुखर्जी सध्या तिची मुलगी शीना बोरा हिच्या हत्याप्रकरणी मुंबईच्या भायखाळा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
कोर्टाकडे वैद्यकीय उपचारासाठी जामीन मागितला होता. मात्र, कोर्टाने न्यायालयीन कोठडीत असताना योग्य ते वैद्यकीय उपचार मिळत असल्याचे स्पष्ट करत जमिनीची गरज नसल्याचे सांगितले. २४ एप्रिल २०१२ रोजी इंद्राणीने तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि वाहनचालक शाम राय यांच्या मदतीने शीना बोराची हत्या केली होती. २५ एप्रिल रोजी जंगलात नेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या हत्याकांडाचा खुलासा २०१५ साली झाला होता. तेव्हापासून इंद्राणी मुखर्जी हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत.