सालेम (तामिळनाडू) : पोलिसांच्या छळवणुकीत बाप-लेकाच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी सांगितले.
मद्रास उच्च न्यायालयाची मंजुरी घेतल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले जाईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. पी. जयराज आणि त्यांचा मुलगा फेनिक्स यांचे मोबाईल फोनचे दुकान आहे. व्यवसायासंबंधी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून दोघांना अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी, सथांकुलम पोलीस ठाण्यात पोलिसांनी त्यांना जबर मारहाण केली, असा त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. या दोघांचा २३ जून रोजी कोविलपट्टी येथील इस्पितळात मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर दोन उपनिरीक्षकांसह चार पोलिसांना निलंबित करण्यात आले.राहुल गांधी यांनी व्यक्त केला शोक01) पी. जयराज आणि त्यांचा मुलगा फेनिक्स यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. या दोघांना न्याय देण्याचीही त्यांनी मागणी केली. कोरोनाच्या साथीमुळे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मी सथांकुलमला जाऊ शकलो नाही. या घटनेस जबाबदार असलेल्यांना शिक्षा होईपर्यंय आंदोलन करा, असा संदेशही त्यांनी काँग्रेसच्या ‘शक्ती’ या व्यासपीठावरून काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठविला आहे.
02) अभिनेता रजनीकांत यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान, तामिळनाडू प्रदेश भाजपचे अध्यक्ष एल. मुरुगन यांनी मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे. यासाठी भाजप पीडितांच्या कु टुंबाला मदत करील, असेही त्यांनी म्हटले आहे.