लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जेईई मेन (संयुक्त प्रवेश) परीक्षेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील पाच बड्या शिकवणी वर्गात (कोचिंग क्लासेस) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्लीतील पथकाने धडक दिली. गेल्या २४ तासांत या पाचही ठिकाणी बारीकसारीक तपासणी करण्यात आली. स्थानिक युनिटमधील सहकाऱ्यांच्या मदतीने सीबीआय, दिल्लीच्या पथकाने मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह दस्तावेज जप्त केल्याची माहिती आहे.
देशातील विविध ठिकाणच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जेईईचा कथित गडबडघोटाळा चर्चेला आला आहे. या गैरप्रकारात नागपुरातील काही जेईई कोचिंग संस्था तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयने काही जणांविरुद्ध जेईई मेन्स परीक्षा २०२१ मध्ये झालेल्या अनियमिततेसंबंधाने प्रकरण नोंदवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जेईई मेन्सच्या ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार करून अनेक विद्यार्थ्यांकडून तगडी रक्कम घेऊन शीर्षस्थ एनआयटीत (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) प्रवेश देण्यासंबंधी खटाटोप केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सीबीआयकडून गेल्या आठवडाभरापासून देशातील विविध भागात छापेमारी करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात दिल्ली, एनसीआर, पुणे, जमशेदपूर, इंदोर आणि बंगलुरूसह अन्य काही ठिकाणी छापेमारी झाली, तर गेल्या २४ तासात दिल्लीचे सीबीआयचे पथक नागपुरात धडकले. त्यांनी स्थानिक सीबीआय युनिटच्या सदस्यांना सोबत घेऊन नागपुरातील नंदनवन, गणेशनगर, आझमशहा चाैकातील काही कोचिंग क्लासेसमध्ये प्रदीर्घ तपासणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या संबंधाने अधिकृत माहिती मात्र सीबीआय अधिकाऱ्यांकडून मिळू शकली नाही.
----