नवी दिल्ली - ज्या सीबीआयला भले भले घाबरतात, त्या सीबीआयने आज दिल्लीतील आपल्याच मुख्यालयावर धाड टाकल्याची घटना घडली आहे. सीबीआयच्या एका पथकाने सकाळी दिल्लीतील आपल्या मुख्यालयात तपासणी केली. सीबीआयला आपल्या काही अधिकाऱ्यानी लाच घेतल्याचा संशय आहे. या अधिकाऱ्यांनी बँक फ्रॉडमधील आरोपीकडून लाच घेतल्याचा संशय असून, या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, आज सकाळी सीबीआयकडून दिल्ली, गाझियाबादसह अनेक ठिकाणीं छापेमारी करण्यात आली आहे.सीबीआयने गाझियाबादमध्ये आपल्या एका अधिकाऱ्याच्या परिसरावर छापा टाकला. हा अधिकारी सध्या सीबीआय अकादमीमध्ये तैनात आहे. या प्रकरणी डीएसपी रँकचे अधिकारी असलेल्या आर.के. ऋषी यांच्यासह चार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चार अधिकाऱ्यांमध्ये आर.के. सांगवान आणि बीएसएसफसीच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.पदाचा दुरुपयोग आणि भ्रष्टाराच्या एका प्रकरणात या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांनी बँक फ्रॉड प्रकरणातील आरोपी कंपन्यांना मदत पोहोचवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. एजन्सीने काही अधिवक्ते आणि अज्ञात व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सीबीआय अधिकाऱ्यांविरोधात सकाळी धाडसत्र सुरू झाले. एसीबीच्या युनिटकडून सीबीआयच्या एका परिसराचा तपास करण्यात आला. सीबीआयचे प्रवक्ते आरसी जोशी यांनी सांगितले की, गुरुवारी दिल्ली, गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम, मीरत आणि कानपूर अशा १४ ठिकाणी धाडसत्र चालले.