नवी दिल्ली : सीबीआयने मंगळवारी देशभरात छापे टाकले. सायबर गुन्हेगारी संदर्भात छापेमारी करण्यात आली. यादरम्यान 105 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी सीबीआयने राज्य पोलिसांच्या मदतीने छापे टाकले आहेत. दिल्लीत 5 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. तर अंदमान, पंजाब, चंदीगड, राजस्थान येथेही छापे टाकण्यात आले आहेत.
या छापेमारीच्या कारवाईला 'ऑपरेशन चक्र' असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि इंटरपोलने शेअर केलेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने या ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयच्या पथकाने देशभरात 87 ठिकाणी छापे टाकले आहेत तर राज्य पोलीस 18 ठिकाणी शोध घेत आहेत.
दिल्लीतील पाच ठिकाणी छापे टाकण्याव्यतिरिक्त, टीमने अंदमान आणि निकोबार बेटे, पंजाब, चंदीगड, राजस्थान, आसाम आणि कर्नाटकमध्येही छापे टाकले आहेत. छाप्यादरम्यान राजस्थानमधील राजसमंद येथे एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कॉल सेंटरमधून एक किलोहून अधिक सोने आणि दीड कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच, लोकांची फसवणूक करणाऱ्या पुणे आणि अहमदाबाद येथील दोन कॉल सेंटरचाही पर्दाफाश झाला आहे.