लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाघ आणि बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा सीबीआयने पदार्फाश केला असून या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. तिनही आरोपींवर वन्यजीव संरक्षक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, दिल्ली आणि राजस्थान येथून वाघ आणि बिबट्या यांच्या नखांची तस्करी होत असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. या अनुषंगाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दोन्ही ठिकाणी छापेमारी केली. छापेमारीत वाघांची सात नखे आणि बिबट्याची १९ नखे अधिकाऱ्यांना सापडली. ती जप्त करण्यात आली आहेत. या नखांची तस्करी करून लाखो रुपयांना विकण्याचा उद्योग ही टोळी करत होती. या प्रकरणी प्रींटर पटेल, परमजीत सिंग आणि अशोक पारेख यांना सीबीआयने अटक केली आहे. त्यांना दिल्लीतील न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.