लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सुशांतसिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार एनसीबीला नसून सीबीआयला आहे. एनसीबीच्या अधिकार क्षेत्रात हा तपास येत नाही, असे रिया व शोविक चक्रवर्तीच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले. ज्या आरोपाखाली रिया आणि शोविकला अटक झाली, ते प्रकरण सीबीआयकडे वर्ग करावे, अशी विनंती रिया व भाऊ शोविकंच्या वतीने वकिलांनी केली.
नार्कोटिक्स ड्रग्स सायकोट्रॉफीक सबस्टन्स (एनडीपीएस) अॅक्टच्या काही कलमांतर्गत या दोन्ही भावंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आठवड्यांपूर्वी विशेष एनडीपीएस न्यायालयाने रिया व शोविकचा जामीन अर्ज फेटाळला. या निर्णयाला दोघांनीही उच्च न्यायालयात आव्हान दिले. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणासंदर्भातील सर्व तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याची बाब अॅड. सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यावर न्या. सारंग कोतवाल यांनी यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ला २८ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.
शोविकची कारागृहात चौकशी करण्यास एनसीबीला परवानगीशोविक चक्रवर्तीसह दीपेश सावंत यांची कारागृहात चौकशी करण्याची परवानगी विशेष न्यायालयाने एनसीबीला गुरुवारी दिली. हे दोघेही सध्या तळोजा कारागृहात आहेत. ते हायप्रोफाईल लोकांच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांची आणखी चौकशी करावी लागेल, असे एनसीबीने न्यायालयाला सांगितले. त्यानुसार, न्या. जी. बी. गुरव यांनी एनसीबीला या दोघांची तळोजा कारागृहात चौकशी करण्यास परवानगी दिली.