पणजी - देवस्थनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपलेली दृष्ये ही विनयभंग प्रकरणातील संशयिताच्या गुन्ह्यांचे पक्के पुरावे असल्याचा जोरदार युक्तिवाद करून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संतोष रिवणकर यांनी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले मंगेशी देवस्थानचे पुजारी धनंजय भावेला न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास विरोध दर्शविला. या प्रकरणात युक्तीवाद मंगळवारी संपला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने निर्णय राखून ठेवला आहे.
संशयित आरोपी भावेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. उभय पक्षातर्फे जोरदार युक्तीवाद झाले. त्यात याचिकेच्याविरोधात युक्तिवाद करताना अॅड. रिवणकर यांनी देवस्थानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमऱ्यातील रेकॉर्डिंगवर भर दिला. ते म्हणाले की संशयितावर जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो सिद्ध करण्याएवढे पुरावे सीसीटीव्ही कॅमऱ्यात रेकॉर्ड झाले आहेत. संशयित अटक चुकविण्यासाठी लपून राहिला आहे. हा देखील पुरावाच ठरत आहे असे त्यांनी खंडपीठासमोर सांगितले. अॅड.जोशी यांनी संशयितासाठी युक्तिीवाद केले. उत्तर गोवा विशेष सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन नाकारल्यामुळे संशयिताने खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठानेही त्याला अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला नाही.