हरियाणातील बहादूरगडमध्ये अंदाधुंद गोळीबार करून INLD चे प्रदेशाध्यक्ष नफे सिंह यांची हत्या करण्यात आली. या खळबळजनक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, हल्लेखोर बराच वेळ कारमध्ये बसून गुन्हा करण्यापूर्वी नफे सिंह जाण्याची वाट पाहत होते. समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज घटनास्थळापासून काही अंतरावरील आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या याच कारमधून शूटर आले होते.
घटनास्थळाच्या आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पोलिसांना एक संशयास्पद कार दिसली आहे. पोलीस वाहनाचा नंबर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. हत्येला अनेक तास उलटूनही पोलिसांना अद्याप आरोपींचा शोध लागू शकलेला नाही. नफे सिंहच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी दोन डीएसपी आणि विशेष टास्क फोर्स तपासात तैनात करण्यात आले आहेत.
नफे सिंह राठी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बहादुरगड रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्यांच्या दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हरियाणा पोलिसांनी 7 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे, पोलिसांनी माजी आमदार नरेश कौशिक, माजी अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष सरोज राठी यांचे पती रमेश राठी आणि काका सासरे कर्मवीर राठी, मेहुणे कमल राठी, माजी मंत्री मांगेराम यांना अटक केली आहे. मांगेराम राठी यांचा मुलगा सतीश राठी, नातू गौरव आणि राहुल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच हल्लेखोर होते.
कारमधून आलेल्या शूटर्सनी नफे सिंह राठी यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, हल्लेखोरांनी त्यांच्या फॉर्च्युनर कारवर मागून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. गोळीबार करणाऱ्यांनी राठी यांच्या गाडीवर 40 ते 50 राऊंड गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात नफे सिंह राठी यांचा मृत्यू झाला तसेच त्यांच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्यालाही जीव गमवावा लागला.
नफे सिंह यांच्यावर हा हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या फॉर्च्युनर कारमध्ये एकूण पाच जण होते. ड्रायव्हरसोबत नफे सिंह पुढच्या सीटवर बसले होते. सायंकाळी 5 च्या सुमारास त्यांचा ताफा बाराही रेल्वे गेटवर पोहोचला तेव्हा त्यांच्या मागून आलेल्या शूटर्सनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले, तर त्यांच्या इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मांडीला आणि खांद्यावरही गोळ्या लागल्या होत्या. त्यांच्या ताफ्यात इतर अनेक वाहनंही होती.